नवी दिल्ली : वक्फ दुरूस्ती विधेयकाची छाननी करणाऱ्या संसदीय समितीची सोमवारची बैठक वादळी ठरली. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर आरोप करण्यात आल्याने विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, बैठकीवर बहिष्कार टाकला.
संसदीय समितीच्या बैठकीत कर्नाटक अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अन्वर मनिप्पडी यांनी साक्ष नोंदवली. वक्फ जमीन घोटाळ्यांत खर्गे आणि कर्नाटकमधील कॉंग्रेसचे काही नेते सामील असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्षेप घेतला. उच्चपदस्थांवर सिद्ध न होऊ शकलेले आरोप करण्यास समितीच्या नियमांनुसार मनाई असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुस्लिमांशी संबंधित विषयावर साक्ष देण्यासाठी हिंदू संघटनांच्या सदस्यांना बोलवण्याच्या हेतूविषयीही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, समितीचे अध्यक्ष असणारे भाजपचे नेते जगदंबिका पाल यांनी विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावले. त्यामुळे नाराज झालेले विरोधक बैठकीतून बाहेर पडले. बैठकीवर बहिष्कार टाकणाऱ्यांमध्ये गौरव गोगोई, इम्रान मसुद, अरविंद सावंत, ए.राजा, संजय सिंह, असदुद्दीन ओवैसी यांचा समावेश होता. समिती नियमांनुसार कार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.