पिरंगुट – महाराष्ट्र शासनाने किल्ले खासगी विकसकांना भाडे तत्वावर देण्याच्या धोरणाचा सर्वत्र विरोध होत आहे. वर्ग दोनचे जे 25 किल्ले सुरवातील भाड्याने देण्यात येणार आहेत अशी चर्चा, त्यात मुळशी तालुक्यातील कोराईगड उर्फ कोरीगड समाविष्ट असल्याने त्यास ढमाले परिवार, गडकिल्ले प्रेमी, विविध संघटनांनी विरोध केला आहे.
मुळशी तालुक्यातील पेठशहापूर व आंबवणे या दोन गावांच्या मध्यभागी कोराईगड आहे. किल्ल्याला मोठा इतिहास आहे. किल्ल्याची स्थितीही चांगली आहे. किल्ल्यावर लक्ष्मी तोफा, छोट्या तोफा, कोराईदेवीचे मंदिर, विस्तीर्ण पठार, तलाव, आहेत. तटबंदी अजुनही शाबुत आहे. या गडाला अनेक ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असतानाही कोराईगड भाड्याने देण्याच्या विचाराचा ढमाले परिवार, गडकिल्ले सेवा समिती चिंचवड, स्वराज्य प्रतिष्ठान, गडकिल्ले प्रेमी व मुळशीकरांनी कडाडून विरोध केला आहे.