चीनविषयी निर्माण झालेल्या विद्वेषामुळे भारताला संधी – गडकरी

नवी दिल्ली – जगभर सध्या जी करोनाची बाधा निर्माण झाली आहे ती चीनमधून उद्भवली असल्याने चीन विषयी जगभर विद्वेषाचे वातावरण आहे. या वातावरणात भारताला चांगली संधी निर्माण झाली असून त्याचा भारताने लाभ करून घ्यायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
विदेशातील विद्यार्थ्यांशी गडकरी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी या संबंधात जपानचे उदाहरण देताना सांगितले की, जपानच्या चीनमधील अनेक कंपन्यांनी तेथील आपला गाशा गुंडाळला आहे. चीन मधून स्थलांतरीत होणाऱ्या कंपन्यांना जपान सरकारने आर्थिक पॅकेजही दिले आहे. चीन मधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांनाही आपण अशाच प्रकारे मदत करून भारतातील गुंतवणूक वाढवली पाहिजे.
चीनने करोनाची माहिती गुप्त ठेवली त्याचा भारतालाही मोठा फटका बसला आहे त्यावर भारत सरकार चीन वर काही कारवाई करणार काय असे विचारता ते म्हणाले की, हा संवेदनशील विषय आहे त्यावर विदेश मंत्रालय किंवा पंतप्रधानच आपली भूमिका स्पष्ट करू शकतील मला या विषयावर भाष्य करता येणार नाही.
भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची इकॉनॉमि करण्याचा पंतप्रधानांचा इरादा आहे त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व सरकारी विभाग आणि अर्थमंत्रालय उपाययोजना करीत असल्याची माहितीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. येत्या काही काळात देशात शंभर लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.





