Police Bharti : राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील सुमारे 15,631 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, सन 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाने जारी केला आहे. 15 हजारांहून अधिक पदांसाठी भरती – राज्याच्या पोलीस दलात 2024 मध्ये रिक्त असलेली आणि 2025 मध्ये रिक्त होणारी एकूण 15,631 पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या पाच संवर्गातील पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून, अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल. वयोमर्यादा शिथिलतेचा लाभ – गेल्या दोन-तीन वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रिया रखडल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली होती. यामुळे विद्यार्थी आणि विविध संघटनांकडून सातत्याने भरतीची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर, शासनाने सन 2022, 2023, 2024 आणि 2025 मध्ये संबंधित पदाची कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना आता अर्ज सादर करून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. शासन परिपत्रकात काय? गृह विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, “सन 2022 ते 2025 या कालावधीत संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.” यामुळे हजारो उमेदवारांना आपले पोलीस दलातील स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पदांचा तपशील – पोलीस शिपाई: 10,908 पदे पोलीस शिपाई चालक: 234 पदे बॅण्डस्मन: 25 पदे सशस्त्र पोलीस शिपाई: 2,393 पदे कारागृह शिपाई: 554 पदे उमेदवारांसाठी संधी – ही भरती प्रक्रिया अनेक तरुणांसाठी मोठी संधी आहे. विशेषत: ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपली होती, त्यांच्यासाठी हा निर्णय दिलासादायक ठरेल. उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन गृह विभागाने केले आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून, लवकरच अर्ज प्रक्रिया आणि परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे अपडेट्स तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.