Pune District : खेडमध्ये दिग्गज व्यक्तींच्या संधी हुकल्या

राजगुरुनगर : खेड तालुक्यात गट, गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने झाल्याने अनेक दिग्गज व्यक्तीच्या संधी हुकल्या आहेत; मात्र त्यांच्या कुटुंबातील महिलांना संधी आल्याने ’कही ख़ुशी कही गम’ ची स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद गट आणि गणांचे आरक्षण आज सोमवारी (दि. 13) जाहीर झाले. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 गट आणि पंचायत समितीच्या 16 गणाचे आरक्षण जाहीर होताच अनेकांनी सोशल मीडियावर पोस्टरबाजी सुरु केली, तर अगोदर पासून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि निवडणुकीची तयारी केल्याच्या दिग्गज नेत्यांच्या पदरी आरक्षणामुळे निराशा आली आहे.
जिल्हा परिषद गटांची सोडत पुणे येथे जिल्हापरिषदेच्या सभागृहात झाली तर राजगुरुनगर येथील खेड पंचायत समितीच्या राजा शिव छत्रपती सभागृहात पंचायत समिती गण आरक्षण सोडत झाली. ही आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी काढली. यावेळी निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक महसूल अधिकारी निलेश घोडके, गोपाळ गोडवे यांच्यासह तालुक्यातील इच्छुक व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिग्गजांना फटका
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी खेड तालुक्यातील अनेकजण इच्छुक होते. मात्र आरक्षण जाहीर झाल्याने या दिग्गज नेत्यांच्या संधी हुकल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाबा राक्षे, खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, संचालक जयसिंग भोगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, राजगुरुनगर सह बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, उद्योजक मनोहर पोखरकर, संजय घनवट आदींचा समावेश आहे. मात्र सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण आल्याने यांच्या कुटुंबातील महिलांना संधी मिळणार आहे.
वाडा : (अनुसूचित जमाती महिला)
वाशेरे : (अनुसूचित जमाती)
कडूस : (सर्वसाधारण)
चास : (सर्वसाधारण महिला)
वाफगाव : (सर्वसाधारण)
रेटवडी : (सर्वसाधारण)
पिंपळगाव तर्फे खेड : (सर्वसाधारण महिला)
मरकळ : (सर्वसाधारण)
मेदनकरवाडी : (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
काळूस : (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
पाईट : (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
आंबेठाण : (सर्वसाधारण महिला)
महाळुंगे : (सर्वसाधारण महिला)
नाणेकरवाडी : (अनुसूचित जाती महिला)
कुरुळी : (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
आळंदी ग्रामीण : (सर्वसाधारण)
राजगुरूनगर : येथे पंचायत समिती निवडणूक 16 गणाचे आरक्षण सोडत काढताना उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, नायब तहसीलदार चेतन मोरे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे आदी.





