“अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं…” मनसेकडून दिपाली सय्यद यांना सडेतोड उत्तर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेणार होते. मात्र, ऐनवेळी ही सभा पुढे ढकलण्यात आली त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावरून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या याच टीकेला आता मनसेकडून सडेतोड उत्तर देत दिपाली सय्यद यांना ओपन चॅलेंज देण्यात आले आहे.
महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, अशी खोचक टीका दीपाली सय्यद यांनी केली होती. याच टीकेला मनसे नेते अखिल चित्रे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी दीपाली सय्यद यांच्या बदललेल्या नावांवरून निशाणा साधला आहे. “अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. २०१४ साली अहमदनगरमधून निवडणूक लढवली, तर नाव दिपाली सय्यद. २०१९ ला शिवसेनेकडून मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढवली, तर नाव सोफिया जहांगीर सय्यद. शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये असताना प्रचारासाठी नाव दिपाली भोसले सय्यद. वारंवार राजकारणासाठी स्वत:चं नाव बदलणाऱ्या तुम्ही. तुम्हाला अवसरवादी नेत्या म्हणावं लागेल. तुम्ही इतरांना नावं ठेवता?”, असे अखिल चित्रे यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, अखिल चित्रे यांनी दिपाली सय्यद यांना वाईड बॉलची उपमा दिली आहे. “तुम्हाला काय उत्तर द्यायचं? म्हणून आम्ही तुम्हाला इतके दिवस वाईड बॉल म्हणून उत्तर देत नव्हतो. इतके तर सरडाही रंग बदलत नाही, जितकी तुम्ही नावं बदलता. आप ते शिवसंग्राम ते शिवसेना हा तुमचा विचार बदलत आणि नाव बदलत झालेला प्रवास आहे. तुमच्यात हिंमत असेल, तर आधी नाव बदलण्यामागचं रहस्य जनतेला आधी सांगा. नंतर हिंदुत्वाच्या, शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या गप्पा मारा. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही उत्तर द्याल”, अशा शब्दांत अखिल चित्रेंनी दिपाली सय्यद यांना आव्हान दिलं आहे.
सभा करायच्याच असतील तर आयोध्या मध्ये करून दाखवा पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात तेही जास्त गर्दी करून. @ShivSena @RajThackeray @mnsadhikrut
— Deepali Sayed (@deepalisayed) May 17, 2022
दिपाली सय्यद यांनी काल एक व्हिडीओ संदेश जारी केला होता. यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेल्या मुन्नाभाई या उपमेचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले.. आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले..महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, असे दिपाली सय्यद या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. याच टीकेला मनसेनी उत्तर दिले आहे.





