शिवाजीराव नाईक यांचा इशारा
शिराळा – आमच्यावर गरळ ओकणाऱ्यांनी तारतम्य बाळगून बोलावे. आम्ही सुसंस्कृत आहोत अन्यथा आम्हालाही तुमच्या भाषेत उत्तर देता येते, असा इशारा आमदार शिवाजीराव नाईक यांनी दोन्ही प्रमुख विरोधी उमेदवारांची नावे न घेता दिला. नाटोली, कनदूर, तडवळे ता. शिराळा येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सत्यजित देशमुख, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
शिवाजीराव नाईक म्हणाले, आमच्यावर टीका करत असताना, गरळ ओकत असताना थोडे तारतम्य बाळगावे. वस्तुस्थिती पाहून बोलावे, उगाच टीका करायची म्हणून बरळू नका. पैशाच्या जोरावर घमेंड दाखवत असाल तर इथली जनता कदापी खपवून घेणार नाही. आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते. मात्र आम्ही सुसंस्कृत आहोत. आम्ही जनतेशी फक्त विकास कामावर बोलू. कारण आम्ही विकासाच्या जोरावरच चारवेळा आमदार झालो आहोत. विरोधकांकडे विकासात्मक मुद्दे नसल्यानेच ते वस्तुस्थिती न पाहता कसेही बोलत सुटले आहेत.
आमचा अजेंडा विकासाचा आहे आणि हा विकास पाहण्याकरिता डोळे आणि डोके शुद्ध असावे लागते. मात्र ते आमच्या दोन्ही विरोधकांकडे नाही. शिराळा विधानसभा मतदार संघाला आम्ही एक कुटुंब मानून काम करत आलो आहे. शिराळा वाळवा असा भेद कधीच केला नाही. मुख्य विकास प्रवाहात इथली गावे आणून त्यांना समृध्द करत आलो आहे. यावेळी संपतराव देशमुख, सुखदेव पाटील, के. डी. पाटील, रघुनाथ पाटील, हणमंतराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या तीनही जाहीर सभांना नाटोली, कनदूर, तडवळे परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.