व्हीव्हीपॅट संबंधात निवडणूक आयोगच्या प्रतिज्ञापत्रावर सुप्रीम कोर्टाचा आदेश
नवी दिल्ली – व्हीव्हीपॅट मशिनच्या संबंधात निवडणूक आयोगाने त्यांचे जे म्हणणे सादर केले आहे त्यावर 21 राजकीय पक्षांनी आठवडाभरात आपली भूमिका मांडावी असे निर्देश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी करताना प्रत्येक लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदार संघातील किमान 50 टक्के मतदान यंत्रांना जोडलेल्या व्हीव्हीपॅट मशिन्सच्या चिठ्यांतील मतांची मोजणी करून ती इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रातील मतदानाशी जुळते की नाही ते पडताळून पाहिले जावे अशी मागणी करणारी याचिका तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू व अन्य 21 विरोधी पक्षांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
त्यावर न्यायालयाने निवडणूक आयोगाचे म्हणणे मागवले होते. ते त्यांनी सादर केल्यानंतर आता न्यायालयाने विरोधी राजकीय पक्षांना त्यांची भूमिका मांडण्याची सुचना केली आहे. निवडणूक आयोगाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे. या मागणीमुळे मतमोजणीला विलंब होऊ शकतो हे महत्वाचे कारण त्यांनी त्यासाठी पुढे केले आहे.