पुसेसावळी, (प्रतिनिधी) – महायुती सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये महाराष्ट्रातील करोडो महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली. याचे स्वागत न करता विरोधक या योजनेवर देखील टीका करत आहेत. विरोधकांमधील काही नेत्यांना आपल्या लेकाला किंवा लेकीला मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यात जाती-जाती, धर्माधर्मात देशाचे वातावरण निर्माण करून विरोधक खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. विरोधकांची फक्त लाडका लाडकी लेक योजना सुरू असल्याची टीका आ. योगेश टिळेकर यांनी केली. शामगाव, ता. कराड येथे भाजपची परिवर्तन यात्रा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. परिवर्तन यात्रेचे आयोजक भाजपचे सातारा जिल्ह्याध्यक्ष धैर्यशील कदम, निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, शंकर शेजवळ,सीमा घार्गे,दिपाली खोत, माजी जि.प.सदस्य सागर शिवदास, मुरलीधरशेठ पोळ, बाळासो पोळ,राहुल यादव ग्रा.पं. सदस्य आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. टिळेकर म्हणाले, गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारा शामगाव व परिसराचा शेती पाण्याचा प्रश्न महायुती सरकाने सोडविला. यापुढे टेंभू योजनेतून शामगाव व परिसरातील गावांना सिंचनाचा लाभ नक्की मिळेल. आगामी निवडणुकीत महायुतीचा उमेदवार एकच असेल आणि तोही भाजपचाच असेल परिवर्तनासाठी आपण सर्वांनी त्याच्यामागे आपले पाठबळ उभे करावे असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी धैर्यशील कदम, मनोज घोरपडे,रामकृष्ण वेताळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब पोळ यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र पोळ यांनी प्रास्ताविक केले. गणेश मामाने यांनी आभार मानले. यावेळी रवींद्र पोळ, बापूराव पोळ, तात्यासो पोळ, कृष्णत पोळ, संतोष कणसे, ज्ञानेश्वर पोळ, उद्धव पोळ,सुभाष जाधव, योगेश फाटक,सचिन डांगे, महेश फाटक, मोहन बागल, अमित कोळी,अक्षय मेनकुदळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.