India Evacuation Iran: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन सुरक्षा’ (Operation Suraksha) ही मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या विशेष विमानाद्वारे २२० भारतीय नागरिक सुरक्षितपणे दिल्लीत पोहोचले आहेत. हवाई दलाचे ‘सी-१७’ विमान मदतीला सज्ज – मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ हे विमान इराणच्या इमाम खुमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाले असून, ते आज शुक्रवारी उशिरापर्यंत हिंडन एअरबेसवर पोहोचण्याची शक्यता आहे. इराणमध्ये सध्या सुमारे १२ ते १५ हजार भारतीय वास्तव्यास आहेत. त्यापैकी ४ हजार नागरिक अशा भागात अडकले आहेत, जिथे लष्करी हालचाली अधिक आहेत. सुटकेच्या मोहिमेत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांना प्रथम स्थान दिले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत २४ तास कार्यरत राहणारी ‘कंट्रोल रूम’ स्थापन केली असून, तेहरानमधील दूतावास स्थानिक प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत आहे. समुद्रात अडकलेल्या १६ भारतीय खलाशांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाची युद्धनौका सज्ज ठेवण्यात आली आहे. एअरस्पेस बंद, पर्यायी मार्गांचा वापर- इराणमधील युद्धसदृश परिस्थितीमुळे एअर इंडिया आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांनी इराणच्या हवाई क्षेत्राचा वापर करणे बंद केले आहे. आता भारतीय विमाने लांबचा आणि पर्यायी मार्ग वापरून युरोप व आखाती देशांकडे जात आहेत. जर इराणने आपली हवाई सीमा पूर्णपणे बंद केली, तर भारत ‘चाबहार बंदरा’मार्गे सागरी मार्गाने नागरिकांना बाहेर काढण्याची शक्यता आहे. भारतापुढील आव्हाने- या तणावाचा थेट परिणाम भारताच्या हितावर होऊ शकतो. इराणमधील ‘चाबहार बंदर’ प्रकल्पात भारताची मोठी गुंतवणूक आहे. तसेच, इराणमधून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परराष्ट्र तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध असल्याने, या संकटकाळात भारताची मुत्सद्देगिरी जगासाठी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, डिसेंबरपासून इराणमध्ये महागाई आणि रियाल चलनाचे ऐतिहासिक अवमुल्यन यामुळे संपूर्ण देशातील लोक रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत आहेत. यामध्ये इराण सरकारच्या कारवाईत आतापर्यंत पाच हजारावर नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर हजारो जणांना अटक केली आहे. यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सरकारला इशारा दिला होता की, जर निदर्शकांच्या मृत्यूत वाढ झाली तर आम्ही कारवाई करू. अमेरिकेने लष्करी कारवाईची तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे.