Operation Sindoor: 7-8 मे रोजी पाकिस्तानकडून तीव्र गोळीबार, नियंत्रण रेषेवर कुटुंबाने अनुभवलं ‘भयानक दृश्य’

कुपवाडा – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानी सैन्याने ७ मे रोजी सायंकाळी अंधार पडताच जम्मू-काश्मीरमधील विविध सेक्टरांमध्ये तीव्र गोळीबार आणि बॉम्बहल्ले सुरू केले. याचा सर्वाधिक फटका नियंत्रण रेषेजवळील (LoC) गावांतील रहिवाशांना बसला. कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागातील बटपोरा येथे पहिला गोळा पडताच दहशत पसरली.
पाकिस्तानी सैन्याच्या सततच्या गोळीबारामुळे रफीक अहमद आणि त्यांचा भाऊ १०x१२ फुटांच्या बंकरकडे धावले. सहा भावांच्या कुटुंबातील १२ मुलांसह सर्वजण तिथेच थांबले. याचवेळी एक तेजस्वी प्रकाश अंधार चिरत आला आणि त्यांच्या डोळ्यादेखत पाच घरे जळू लागली. अवघ्या अर्ध्या तासात पाच घरांचा समूह, पाच दुकाने आणि दोन टॅक्सी जळून खाक झाल्या. रफीक यांचा भाऊ तस्वीर अहमद म्हणाले, “आम्ही फक्त कपड्यांशिवाय काहीच वाचवू शकलो नाही. आग पसरताच आम्ही अग्निशामक दलाला बोलावले, पण गोळीबारामुळे बंकरमध्ये परत पळावे लागले.”
माजी सैनिक असलेल्या रफीक यांनी सांगितले की, त्यांनी चार दशके मेहनत करून हे घर बांधले होते. चार दिवसांपूर्वीच त्यांनी घराला रंग दिला होता. “आता आम्ही कुठे जाऊ, कोणाची मदत मागू?” जळालेल्या घरांमध्ये वॉशिंग मशीन, धान्य, शालेय पुस्तके, भांडी आणि कपडे खाक झाले.
१९९९ नंतरचा सर्वात तीव्र गोळीबार –
बटपोरा गाव नियंत्रण रेषेजवळ असून, तंगधार शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. सेनेची तोपखाना युनिट काहीशे मीटरवर आहे. तंगधारच्या शतपल्ला येथील निसार अहमद म्हणाले, “१९९९ च्या कारगिल युद्धानंतर मी इतका भयंकर गोळीबार प्रथमच पाहिला.” रविवारी भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धबंदी झाल्याने गोळीबार थांबला आणि रफीकसह सहा कुटुंबे बटपोराला परतली.





