Operation Devil Hunt: बांगलादेशात 1308 जणांना अटक

Operation Devil Hunt Bangladesh – बांगलादेशात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन डेव्हिल हंटच्या माध्यमातून देशभरात तब्बल १,३०८ जणांना अटक करण्यात आली आहे. तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्यांच्या विरोधात शनिवार रात्रीपासून धडक कारवाई करण्यात येऊ लागली आहे. जोपर्यंत सर्व समाजकंटकांना अटक होत नाही, तोपर्यंत हे ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू राहिल, असे देशातल्या हंगामी सरकारने म्हटले आहे.
ढाक्याच्या बाहेरील भागात अवामी लीग नेत्याच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात विद्यार्थी कार्यकर्ते जखमी झाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. लष्कर, पोलिस आणि विशेष युनिट्सच्या संयुक्त दलांनी पहिल्या २४ तासांत महानगरे आणि इतर प्रदेशांमध्ये २७४ लोकांना अटक केली.
देश अस्थिर करू इच्छिणाऱ्यांना लक्ष्य करून ही कारवाई केली जाईल… सर्व राक्षसांचा नायनाट होईपर्यंत हे सुरूच राहील, असे निवृत्त गृह सल्लागार लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी म्हणाले. तर शुक्रवारी, मुख्य सल्लागार युनूस यांनी कडक कायदा आणि सुव्यवस्थेचे आवाहन केले आणि पदच्युत पंतप्रधानांच्या कुटुंबाच्या आणि फॅसिस्ट अवामी लीगच्या नेत्यांच्या मालमत्तेवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले.
बांगलादेशमध्ये गेल्या चार दिवसांपासून अशांतता आहे, शुक्रवारी रात्री गाजीपूरच्या दक्षिणखान भागात हिंसाचार उसळला. माजी स्वातंत्र्ययुद्ध मंत्री मोझम्मेल हक यांच्या घरावर जमावाने हल्ला केला, त्यामध्ये किमान १४ जण जखमी झाले होते. गाजीपूरमध्ये पहिल्यादा हिंसाचार झाला, तिथे अधिकाऱ्यांनी ८१ अवामी लीग कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान हकच्या घरी होणारी लूट रोखण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला, असा दावा भेदभाव विरोधी विद्यार्थी चळवळीने केला आहे.
गाजीपूरमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांमागील लोकांना न्याय मिळेल. या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यापैकी अनेकांना आधीच अटक करण्यात आली आहे. ज्यांना अटक करण्यात आली नाही त्यांना लवकरच अटक केली जाईल आणि आम्ही त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी याची खात्री करू, असे आश्वासन गृह व्यवहार सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी दिले आहे.
शेख हसीना भारतात राहत आहेत –
दरम्यान, गेल्या वर्षी बांगलादेशात शेख हसीना यांच्या सरकारविरुद्ध बंड झाले तेव्हा त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता, तेव्हापासून 77 वर्षीय शेख हसीना भारतात राहत आहेत. अवामी लीगचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने मोहम्मद युनूस सरकारला जमाव संस्कृती थांबवून देशात कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मोहम्मद युनूस यांनीही सर्व लोकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
देशाची परिस्थिती कधी सुधारेल ?
बांगलादेश सतत राजकीय अस्थिरतेशी झुंजत आहे आणि अशा परिस्थितीत या देशातील परिस्थिती कधी सुधारेल?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोहम्मद युनूस सरकारवर अवामी लीग समर्थक आणि कार्यकर्त्यांना सतत लक्ष्य केल्याचा आरोप आहे. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले आणि अत्याचाराच्या घटना घडल्या. याबाबत भारताच्या वतीने तीव्र निषेधही नोंदवण्यात आला.
बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री घेणार जयशंकर यांची भेट
बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन पुढील आठवड्यात ओमानमध्ये होणाऱ्या हिंद महासागर परिषदेच्या वेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये आणखी ताण येऊ नये यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही भेट होणार असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. आठवी हिंद महासागर परिषद १६-१७ फेब्रुवारी रोजी मस्कत येथे होणार आहे. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने नवी दिल्लीस्थित संशोधन संस्था इंडिया फाउंडेशनने आयोजित केलेली ही परिषद प्रादेशिक संवादासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करते. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये आणखी ताण येऊ नये म्हणून बांगलादेश या बैठकीवर भर देण्याची शक्यता आहे.





