nagar | हंगा गावातील उघडी डीपी धोकादायक

पारनेर, (प्रतिनिधी) – महावितरण कंपनीकडून हंगा गावात बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मर खाली डीपी उभारण्यात आली आहे. डीपी स्मशानभूमी रोड लगतच आहे.
या परिसरात स्मशानभूमी असल्याने कायमच वर्दळ असते. या परिसरात अंत्यविधी व दशक्रिया विधी असल्यास नागरिक डीपी शेजारीच टू व्हीलर पार्क करत असतात. तसेच लहान मुले, भटकी जनावरे व नागरिक यांना या उघड्या डीपीचा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागांमध्ये वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मर खाली डीपी उभारण्यात आली आहे. या डीपीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीसमोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आहे तर काही ठिकाणी डीपीचे दार लावण्याचे कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. आता पावसाळा सुरू झाला असून, डीपीला झाकण नसल्याने पावसाचे पाणी आतमध्ये शिरण्याची शक्यता असल्याने ते धोकादायक ठरत आहे.
विशेष म्हणजे काही डीपी गावातील घराशेजारी ,मैदानालगत आहे. याकडे वितरण कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली जाते. काही ठिकाणी डीपीचे झाकण तुटले अथवा नादुरुस्त असल्यास ते पुन्हा योग्य करण्याची जबाबदारी महावितरण घेत नाही.
असे असताना ग्रामीण भागात ट्रान्सफार्मरच्या खाली उभारण्यात आलेली डीपी कधी सुरळीत होणार, जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कंपनी कामाला लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी होत असलेली टाळाटाळ थांबावी, अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.





