Pimpri : उघडे डीपी बॉक्स की ‘मृत्यूचे सापळे’?

भोसरी : भोसरी एमआयडीसी परिसरात नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणारी गंभीर स्थिती समोर आली आहे. या परिसरातील वीजपुरवठा करणारे डीपी बॉक्स अनेक ठिकाणी उघडे, खराब अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी डीपी बॉक्सला दरवाजेच नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिक, लहान मुलं, वयोवृद्ध आणि भटकंती प्राण्यांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
या परिसरात अनेक नागरिकांनी वेळोवेळी महावितरणकडे तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. उघडे डीपी बॉक्स म्हणजे जिवंत विद्युतसंपर्क, ज्याच्या स्पर्शाने कोणताही नागरिक किंवा प्राणी गंभीर जखमी होऊ शकतो. काही डीपी बॉक्स पूर्णतः गवताच्या आड लपलेले असून त्यांचं वायरिंग उघडे आणि असुरक्षित आहे. जर कोणी अपघाताने त्या बॉक्सला स्पर्श केला, तर प्राणघातक विद्युत धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लहान मुलं, प्राणी आणि सर्वसामान्य नागरिक धोक्यात
एमआयडीसी परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळेतील मुले, वृद्ध नागरिक, सामान्य प्रवासी रोज त्या रस्त्यावरून जातात. तसेच या परिसरातील भंगार गोळा करण्यासाठी महिला, पुरूष व लहान मुले फिरत असतात. झाडाझुडपांमुळे काही डीपी बॉक्स सहज लक्षात देखील येत नाहीत. त्यामुळे अनपेक्षित अपघात होण्याचा धोका सतत उपस्थित आहे. याच भागात भटकंती करणारे कुत्रे, गायी, डुकरं अन्नाच्या शोधात फिरत असतात. यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक प्रशासन आणि पालिकेचीही उदासीनता
महावितरणप्रमाणेच स्थानिक प्रशासन व पालिकेकडूनही पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. या डीपी बॉक्सभोवती वाढलेली झुडपे, गवत, ओलावा यामुळे उपकरणांची देखभाल होऊ शकलेली नाही. यामुळे शॉर्टसर्किट, स्फोट, अग्नितांडव यांसारख्या दुर्घटनांची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील विविध भागातही अशाच प्रकारे डीपी बॉक्स उघडे आहेत. याबाबत बातमी आल्यावर प्रशासन जागे होते. त्यानंतर डीपी बॉक्सला झाकण लावले जाते.
डीपी बॉक्सची झाकणे जातात तरी कुठे?
शहरातील बहुतांश भागातील डीपी बॉक्सला झाकणे नसल्याचे दिसून येते. अनेकदा भंगार वेचक चोरटे डीपी बॉक्सची झाकणे चोरून ती भंगारात विकतात. पोलिसांनी भंगार व्यावसायिकाला कोणते साहित्य कोणाकडून घेतले याची नोंद करण्यास सांगितले आहे. मात्र भंगार व्यावसायिकांनी पोलिसांच्या सूचनेला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.
तत्काळ कार्यवाहीची गरज
महावितरणने याप्रकरणी तातडीने लक्ष घालून उपाययोजना करावी. दुर्घटना घडल्यानंतर कृती करण्याचा अर्थ नसतो. नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य देणे ही त्यांच्या जबाबदारीचा भाग आहे. अपघात होण्याआधी उपाययोजना करून सुरक्षित वीजपुरवठा आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे गरजेचे आहे.
नागरिकांची मागणी
सर्व उघडे डीपी बॉक्स तात्काळ बंद करावेत.
लोखंडी दरवाजे लावून सुरक्षेसाठी लॉक व्यवस्था करावी.
डीपी भोवती झुडपे, गवत हटवून परिसर स्वच्छ ठेवावा.
प्रत्येक बॉक्सजवळ इशारा फलक लावण्यात यावेत.
डीपी बॉक्सची नियमित तपासणी व देखभाल करावी.





