Pimpri : सदगुरू नगरमध्ये ‘ओपन बार’

भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील सदगुरू नगर परिसरात वाईन शॉपच्या समोर भरदिवसा खुलेआम मद्यपान सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील वर्तन, छेडछाड आणि अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला व विद्यार्थ्यांचे रोजचे जगणे असह्य बनले आहे. पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बिनधास्त मद्यपींना मोकळे रान मिळाले असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
वाईन शॉपसमोर हातगाड्या, टेम्पो आणि फेरीवाल्यांच्या आडोशाला मद्यपी उभे राहून दारू पितात. प्लॅस्टिकचा कचरा, फुटक्या बाटल्यांचे ढीग, अन्नाचे उरलेले अंश आणि बांधकामाचा मलबा यामुळे परिसर विद्रूप व अस्वच्छ झाला आहे. अशा घाणीतून शेकडो महिला, शाळकरी मुले रोज ये-जा करतात. मात्र मद्यधुंदांकडून अशोभनीय वर्तन, शिवीगाळ, छेडछाड करणे यामुळे भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. काही महिलांनी या मार्गावरून जाणेच बंद केले आहे.
या भागात हॉटेल्स, वाईन शॉप असून समोरच रस्त्यावर दारूचा अड्डा तयार झालं आहे. नागरिकांनी पोलीस आणि महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने त्वरीत कारवाई केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. सदगुरू नगरमधील बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस व महापालिकेने तात्काळ संयुक्त मोहीम हाती घेणे आवश्यक झाले आहे. अन्यथा या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहील, हे निश्चित!
नागरिकांच्या मागण्या
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई व्हावी. वाईन शॉप मालकाला याबाबत स्पष्ट ताकीद द्यावी. या भागात पोलिसांची गस्त ठेवावी. परिसरातील कचरा व बांधकामाचा ढिगारा हटविण्यात यावा.





