Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया आज, 05 मे 2026 रोजीच्या टॉप 10 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी… (Top 10 News) १) गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध दरात वाढ; नवे दर 21 मेपासून लागू होणार वाढत्या महागाईदरम्यान सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसलाय. गोकुळ दूध संघ यांनी गाईच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ जाहीर केलीय. हे नवे दर 21 मेपासून लागू होणार आहेत. मात्र, म्हशीच्या दुधाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात वितरित होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील गाईच्या दुधासाठी ही दरवाढ लागू असेल. इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, पॅकेजिंग आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे दूध संघाने स्पष्ट केलंय. २) महाराष्ट्रात सर्व्हे केला तर शिंदेंना मुख्यमंत्रिपदासाठी जास्त पसंती : बच्चू कडू बच्चू कडू यांनी महाराष्ट्रात आज सर्वेक्षण झाले तर मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, असे विधान केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. या विधानावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया देण्यात आलीय. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी बच्चू कडूंना “नौटंकीछाप” म्हणत टीका केलीय. ज्यांना स्वतःचा मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांनी महाराष्ट्राबद्दल बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, बच्चू कडूंनी पंढरपूरमध्ये बोलताना “जनतेमध्ये आजही शिंदेंची लोकप्रियता कायम आहे,” असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यातील कथित स्पर्धेच्या चर्चांना उधाण आलंय. ३) पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक विकास अर्जुन पारखी यांचा जागीच मृत्यू झाला, तर फॉर्च्युनरमधील तिघेजण गंभीर जखमी झालेत. जखमींमध्ये प्रकाश भेगडे यांचाही समावेश असून त्यांच्या डोक्याला दुखापत झालीय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पौड पोलीस स्टेशन येथे फॉर्च्युनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भीषण धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ४) राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग; पार्थ पवारांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे वगळल्याने राष्ट्रवादीत नाराजीचे वातावरण आहे. ही केवळ प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले असले, तरी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षातील वाद आणखी तीव्र केलाय. ५) नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. घटसर्प या गंभीर आजारामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाकडून घटसर्प हा आजार नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असतानाच ही घटना घडल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मृत बालके मालेगावात वास्तव्यास असलेल्या राजस्थानी कुटुंबातील असल्याची माहिती समोर आलीय. लसीकरण मोहिमांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतानाही अशी घटना घडल्याने प्रशासन हादरले आहे. ६) पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढणार?; होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची मोठी खेळी होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे जागतिक तेलबाजारात खळबळ उडालीय. ट्रम्प प्रशासनाने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवरील तात्पुरती सूट वाढवण्यास नकार दिल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेल दरांवर होऊ शकतो. रशिया-युक्रेन युद्धानंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारताने रशियन तेलावरील अवलंबित्व वाढवले होते. मार्च २०२६ मध्ये भारताच्या एकूण तेल आयातीपैकी जवळपास ५० टक्के तेल रशियाकडून आले होते. मात्र, आता सूट रद्द झाल्याने पुरवठा आणि किंमतींवर दबाव वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, इंधनदर वाढल्यास महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. ७) थायलंडमध्ये भीषण रेल्वे अपघात; ट्रेन-बस धडकेत ८ ठार, बसला आग लागून स्फोट बँकॉक येथे शनिवारी भीषण रेल्वे अपघात घडला. राचाथेवी परिसरातील रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेन आणि बसची जोरदार धडक होऊन किमान ८ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. धडकेनंतर बसला आग लागून स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. थायलंडचे उप परिवहन मंत्री सिरीपोंग अंगकासाकुलकियात यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे फाटक पूर्णपणे बंद होण्याआधीच मालगाडी वेगाने आली आणि चालकाला वेळेत ब्रेक लावता न आल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ८) 42 व्या वर्षी झाली आई, दान केलं 60 लीटर ब्रेस्ट मिल्क भारतीय बॅडमिंटनमधील माजी स्टार खेळाडू ज्वाला गुट्टा यांनी मानवतेचा आदर्श ठेवणारे प्रेरणादायी कार्य केलंय. 42 व्या वर्षी आई बनलेल्या ज्वाला गुट्टा यांनी नवजात बाळांच्या मदतीसाठी तब्बल 60 लिटर स्तनदूध दान केलंय. एप्रिल महिन्यात त्यांनी गोंडस मुलगी ‘मीरा’ला जन्म दिला. अनेक नवजात बालकांना योग्य वेळी आईचे दूध मिळत नसल्याने त्यांचे प्राण धोक्यात येतात. अशा बालकांसाठी ज्वाला यांनी पुढाकार घेत ब्रेस्ट मिल्क डोनेट केलंय. त्यांच्या या सामाजिक जाणीवेच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून अनेक मातांसाठी त्यांनी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलंय. ९) संजय दत्तला मोठा धक्का; ‘आखिरी सवाल’ रिलीज होण्याआधीच चित्रपटावर बंदी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा बहुचर्चित ‘आखिरी सवाल’ चित्रपट वादात सापडलाय. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटावर UAE मध्ये बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासावर आधारित कथानक आणि काही संवेदनशील सामाजिक-राजकीय मुद्द्यांमुळे UAE सेन्सॉर बोर्डाने अनेक कट्सची मागणी केली होती. मात्र, मेकर्सनी मूळ व्हर्जनच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याने चित्रपटाला परवानगी नाकारण्यात आलीय. या चित्रपटात संजय दत्तसोबत नमाशी चक्रवर्ती, अमित साध, समीरा रेड्डी, नीतू चंद्रा आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावर या बंदीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. १०) एमएस धोनी 18 मे ला सीएसकेसाठी शेवटचा सामना खेळणार? हर्षा भोगलेंचे मोठे वक्तव्य चेन्नई सुपर किंग्स साठी आयपीएल 2026 हंगाम निराशाजनक ठरत असतानाच एमएस धोनी यांच्या पुनरागमनाची चर्चा जोर धरू लागली आहे. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी मोठं वक्तव्य करत 18 मे रोजी धोनी मैदानात उतरू शकतात, असे संकेत दिलेत. चेन्नईतील चेपॉक मैदानावर सीएसकेचा हा अखेरचा लीग सामना असणार असून संपूर्ण शहर पिवळ्या रंगात रंगलेलं दिसेल, असं भोगले म्हणाले. धोनी यापूर्वी “माझा शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत व्हावा,” अशी इच्छा व्यक्त केली होती. काफ इंज्युरीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर असलेले 44 वर्षीय धोनी आता फिट असल्याचं सांगितलं जात असून, चाहत्यांसाठी हा सामना भावनिक ठरू शकतो.