पिंपरी | आठवडाभरात सायबर पोलीस ठाण्यात एकच गुन्हा दाखल

पिंपरी (प्रतिनिधी) – किती रकमेच्या फसवणुकीपर्यंतचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल करायचे, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे गेल्या आठवडाभरात केवळ एकच गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. लवकरच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दसर्याच्या मुहुर्तावर सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलिसांनी दिली.
एवढेच नव्हे तर नव्याने कार्यान्वित झालेल्या पोलीस ठाण्यात एक गुन्हा देखील दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
मात्र त्यानंतर गेल्या आठवडाभरात एकही गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाला नाही. त्याऐवजी स्थानिक पोलीस ठाण्यात सायबर क्राइमची नोंद होत असल्याचे दिसून आले.
याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवीकिरण नाळे यांना विचारले असता ते म्हणाले की, सायबर पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, पाच उपनिरीक्षक आणि ४५ कर्मचारी आहेत.
शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होणार्या सायबर गुन्ह्यांची संख्या पाहता सर्व गुन्हे सायबर क्राइम पोलीस ठाण्याला तपास करणे शक्य नाही.
त्यामुळे किती रकमेच्या पुढील गुन्हे सायबर पोलीस इाण्याकडून तपासाकरिता देण्यात यावे, यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे मार्गदर्शन मागितले आहे. त्यांनी याबाबतचे आदेश दिल्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील.
पिंपरी चिंचवड शहरात मोठमोठ्या कंपन्यांचे जाळे आहे. तसेच हिंजवडी आणि तळवडे भागात आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये काम करणारे शहरातच वास्तव्यास आहेत.
सध्या शेअर्स बाजार, अमली पदार्थ तस्करी, बिल न भरल्याने सेवा खंडित करण्याची धमकी देत, विनयभंग आदीबाबतचे गुन्हे शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. दिवसेंदिवस अशा गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे. अशावेळी सायबर पोलीस ठाण्याच्या निर्मितीची नितांत आवश्यकता होती.
लॅब नाही आणि ठाणे सुरु केले
सध्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाले असले तरी सायबर गुन्ह्यांच्या तपासाकरिता सायबर लॅब अत्यंत आवश्यक आहे. मात्र सायबर लॅब अद्याप मिळालेली नाही. शासन स्तरावर याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत.
ही सायबर लॅब मिळाल्यावरच सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आवश्यक असते. अत्याधुनिक सुविधा नसतानाही सायबर पोलीस ठाणे सुरु करण्याची घाई का केली? असा प्रश्न उपस्िथत होत आहे.





