पुणे – करोना पार्श्वभूमीवर न्यायालयात 30 नोव्हेंबरपर्यंत केवळ महत्त्वाच्या दाव्यांची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. सुरुवातीला जिल्हा न्यायाधीशांमार्फत वकिलांची मते जाणून घेऊन त्यानंतर बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. शिवाजीनगर येथील न्यायालयाचे कामकाज सध्या 11 ते 2 या वेळेत सुरू आहे. रिमांड, जामीन, खटल्यातून वगळण्याचा अर्ज आणि निकालावर असलेल्या दाव्यांवर सुनावणी होत आहे. हीच परिस्थिती 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. करोनामुळे सात महिन्यांहून अधिक काळापासून न्यायालयात केवळ महत्त्वाच्या दाव्यांची सुनावणी होत आहे. दरम्यान, न्यायालयीन कामकाजाबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यामध्ये तत्कालीन करोनाची परिस्थिती पाहून 1 डिसेंबरपासून न्यायालय नियमितपणे सुरू करायचे की नाही यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले.