‘तिरुपती बालाजी मंदिरात केवळ हिंदूनाच…’, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

N Chandrababu Naidu | आंध्र प्रदेशमधील तिरुमला-तिरुपती देवस्थानम (TTD) म्हणजेच प्रसिद्ध तिरुपती मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तिरुपती मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी दिली पाहिजे, असे वक्तव्य आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी व्यक्त केले आहे. चंद्राबाबू नायडू हे देवदर्शनासाठी आले होते. ते त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि कुटुंबीयांसह तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा-अर्चना करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी बोलताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, तिरुपती मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी दिली पाहिजे. सध्या इतर समुदायांचे लोक येथे काम करत असतील, तर त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेत त्यांना अन्य ठिकाणी काम दिले जाईल.
मंदिरात इतर समाजाची नागरिक काम करत असल्यास त्यांना इतर ठिकाणी नोकरी दिली जाईल, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी देशभरातील सर्व राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये वेंकटेश्वर स्वामींचे मंदिर उभारण्याच्या योजनेबाबत देखील माहिती दिली. अनेक भक्त विदेशातही अशी मंदिरे स्थापन करण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, तिरुमलाच्या डोंगरांवर कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक गोष्टींना परवानगी नसल्याची माहिती चंद्राबाबू नायडू यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मागील सरकारने मंदिराच्या जवळच 35.32 एकर जमिनीवर मुमताज हॉटेल उभारण्यास परवानगी दिली होती, पण त्यांच्या सरकारने ती मंजुरी रद्द केली आहे. या क्षेत्रात कोणत्याही खासगी संस्थेला व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





