पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात अवघ्या 35 फटका दुकानांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र दहापट म्हणजे 350 हून अधिक अनधिकृत फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. या दुकानांना प्रशासनाकडून अभय मिळत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. फटाक्यांची दुकाने शक्यतो मोकळ्या मैदानात असावी, असा नियम आहे. जर बंदीस्त जागेत असतील तर त्यासाठी वेगळे नियम आहेत. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून शहरात 350 हून अधिक फटाक्याची दुकाने असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत तुकाराम नगर पोलीस चौकीच्या समोरच दरवर्षी प्रमाणे यंदाही फटाक्याची अनधिकृत दुकाने थाटली आहेत. हीच स्थिती शहराच्या विविध भागांमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे गजबजलेल्या बाजारपेठेतही फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. पोलिसांच्या आर्थिक आशिर्वादामुळेच ही दुकाने सुरू आहेत. तसेच राज्य सरकार आणि हरित लवादाने दिलेल्या वेगवेगळ्या आदेशामुळे विक्रेते आणि नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मोठ्या आवाजाचे फटाके विक्रीला बंदी नाही मात्र असे फटाके फोडण्यास बंदी आहे. यामुळे मोठ्या आवाजाचे फटाके फोडल्यास पोलीस कारवाई होऊ शकते, अशी भीती सोशल मीडियावरून दाखविण्यात येत आहे. अनधिकृत फटाक्याच्या दुकानांवर कारवाई करण्याचा अधिकार पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाला आहे. मात्र स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे अशी कारवाई होताना दिसत नाही. यंदाच्यावर्षी करोनामुळे अनेकांनी दुकाने टाकली नाहीत. तरीदेखील शहरात 350 हून अधिक फटाक्याची अनधिकृत दुकाने आहेत. फटाक्याचा आवाज व धुरामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. त्यामुळे फटाके फोडू नका, असे आवाहन दरवर्षी निसर्गप्रेमी करतात. मात्र यंदा त्यात करोनाची भर पडली आहे. करोनाचा थेट परिणाम फुफ्फुसावर होत असल्याने फटाक्याच्या धुरामुळे त्यांच्यावर आणखी परिणात होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसल्याने फटाके घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.