satara | जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्या

सातारा, (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयांमध्ये केवळ दहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध आहे. निगेटिव्ह वर्गाच्या रक्ताची मोठी टंचाई असून जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिरे घटल्यामुळे ही टंचाई झाली आहे. सामाजिक संस्था तसेच शासकीय स्तरावरूनही रक्तसंकलनासाठी वाढीव प्रयत्न होणे गरजेचे आहे. रक्त साठा घटल्यामुळे थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांची कूप गैरसोय होत असून त्यांना तातडीचे रक्त उपलब्ध होणे गरजेचे बनले आहे.
सातारा जिल्हा रुग्णालय, कराड उपजिल्हा रुग्णालय या दोन ठिकाणी सरकारी रक्तपेढ्या आहेत. याशिवाय नऊ खासगी रक्त पेढ्या असून वाई येथे सरकारी रक्त संकलन केंद्र आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये केवळ दहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध असल्यामुळे रक्ताच्या पुरवठ्याची तातडी ऐरणीवर आली आहे.
गर्भवती माता, थॅलेसिमियाचे रुग्ण अथवा अपघातातील गंभीर जखमी रुग्ण यांना रक्ताची तातडीने गरज भासत असते. मात्र, केवळ दहा दिवसांच्या रक्त साठ्यामुळे जिल्हा रुग्णाण्यात येणाऱ्या रुग्णांना उपचार कसे करावे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन कक्षामध्ये गेल्या चार महिन्यांपासून रक्तदान शिबिरांचे कोणतेही आयोजन झालेले नाही. जिल्ह्यामध्ये कोणत्याही खासगी रक्तपेढीमध्ये किमान दहा ते बारा रक्त पिशव्यांची मागणी असते. ओ पॉझिटिव्ह हा वैश्विक रक्तदाता समजला जातो.
मात्र, ए निगेटिव्ह आणि बी निगेटिव्ह रक्तदाते दुर्मिळ असतात. या गटाच्या रक्ताची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्त संकलन कार्यक्रमांना मर्यादा आल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसून उष्माघाताचे प्रकार उद्भवतात, रक्तातील ग्लुकोज पातळी कमी झाल्यामुळे चक्कर येणे, रक्ताच्या गुठळ्या होणे असे गंभीर प्रकार उदभवू शकतात.
या कारणांमुळे उन्हाळ्यामध्ये होणारी रक्तदान शिबिरे एक ते दोन टक्के इतकीच असतात. रक्तदाता चळवळ वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेषतः जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
रक्तदाता सुदृढ 18 वर्षे पूर्ण किमान हिमोग्लोबिन प्रमाण 10.5 इतके असणे आवश्यक आहे. रक्तदान शिबिराविषयी जनजागृती वारंवार केली जाते. मात्र, तरीही सुदृढ रक्तदाते रक्तदानासाठी पुढे येत नाहीत ही अडचण आहे. येत्या दहा दिवसांत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन झाले नाही तर सरकारी स्तरावरचा रक्त साठा अत्यंत मर्यादित होणार आहे.
रक्तदान करावे- डॉ. युवराज करपे
रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे. रक्तदानाचे कोणतेही अपाय होत नाहीत, रक्तदान केल्याने रक्ताभिसरणाला आपोआप चालना मिळते याशिवाय शासकीय पातळीवर आरोग्य विभाग सामूहिकपणे संघटित राहील, रक्तदाता माहिती संकलन विभागांमध्ये याविषयीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याविषयीचे महत्त्वाचे कार्यक्रम घेतले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे





