पुणे – नव्या वर्षातही ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम आहे. वेगवेगळ्या प्रकारची आमिषे तसेच बतावणीने सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये 62 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक केली. अशा चार घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान आहे.
मोबाइल खरेदीच्या बहाण्याने गंडा
संकेतस्थळावर जुने मोबाइल विक्रीची जाहिरात करणाऱ्या वारजे भागातील ऋषिकेश सोमासे (22) याची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करण्यात आली. सोमासे यांच्याकडे मोबाइल खरेदीचा बहाणा करणाऱ्या अज्ञाताने तो लष्करात असल्याची बतावणी केली होती. आरोपीने ऑनलाइन पद्धतीने सोमासे याच्या खात्यातून 15 हजार 300 रुपये काढून घेतले.
बोलण्यात गुंतवून रक्कम हडपली
सिंहगड रस्ता भागातील रहिवासी नितीन कबीर यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कबीर हे भोसरीतील एका कंपनीत उपव्यवस्थापक आहेत. गेल्या वर्षी त्यांना कंपनीच्या कामासाठी फरिदाबाद येथे जायचे होते. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने दिल्लीतील एका हॉटेलमध्ये खोलीची नोंदणी केली. त्यानंतर कबीर यांनी पुन्हा हॉटेलमध्ये खोल्यांची नोंदणी करणाऱ्या सेवेच्या ग्राहक तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधला. “तुम्ही जमा केलेली रक्कम 48 तासांनंतर बॅंक खात्यात जमा केली जाईल,’ असे सांगण्यात आले. त्याचवेळी अज्ञाताने कबीर यांना लिंक पाठवली. त्यांना बोलण्यात गुंतवून ऑनलाइन पद्धतीने 99 हजार 980 रुपये आणि 10 हजार रुपये काढण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे तपास करत आहेत.
बनावट ई-मेलद्वारे 51 लाखांची फसवणूक
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी सचिन जाधव यांनी यासंदर्भात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर चोरट्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालकांच्या ई-मेल खात्याशी साध्यर्म असणारा बनावट इमेल तयार केला. त्यानंतर बनावट ई-मेल जाधव यांना पाठवला. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे बतावणी करून 8 ते 22 ऑक्टोबर 2018 या कालावधीत जाधव यांना चोरट्यांनी एका बॅंकेच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. 51 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत नुकताच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे तपास करत आहेत.
किराणा माल विक्रेत्याची फसवणूक
कोंढवा भागातील किराणा माल विक्रेत्याला दूध पावडर खरेदी व्यवहारात 9 लाख 88 हजार 779 रुपयांचा गंडा घालण्यात आला. पराग अहिरराव (रा. कोंढवा बुद्रुक) यांनी यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अहिरराव यांना दूध पावडर खरेदी करायची होती. त्यांनी इंदूरमधील ओमसाई एंटरप्रायजेसच्या मालकांबरोबर संपर्क साधला. खरेदी व्यवहारापोटी अहिरराव यांनी ओमसाई एंटरप्रायजेसच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. त्यानंतर अहिरराव यांना दूध पावडर पाठवली नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार तपास करत आहेत.