पिंपरी – करोना संसर्गामुळे देशात सुरू असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कवी संमेलन घेणे शक्य नसल्याचे ओळखून फुलोरा परिवाराच्या वतीने रविवारी (दि. 12) यूट्युब लाईव्ह ऑनलाइन कवी संमेलन घेण्यात आले. त्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 83 कवी-कवियित्री सहभागी झाले होते.
फुलोरा परिवार सदस्या सीमा गांधी यांच्या कल्पनेतून व फुलोरा समूह अध्यक्ष सुनील सातपुते यांच्या प्रयत्नातून हे ऑनलाइन यूट्युब लाईव्ह कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका जोत्स्ना चांदगुडे होत्या. चंद्रकांत वानखेडे, डॉ.अशोककुमार पगारिया, पुरुषोत्तम सदाफुले, प्रा. सुरेखा कटारिया, अनुज केसकर, प्रदीप कदम, सुहास घुमरे, दिनेश भोसले, फुलोरा कोअर कमिटीचे सदस्य रज्जाक शेख, रंजना बोरा यांच्यासह राज्यभरातील कवी-कवियित्रींनी या कवी संमेलनात ऑनलाइन सहभाग घेतला. बंडा जोशी यांची हास्य कविता रंगतदार ठरली. कविता रसिकांना घरबसल्या कवितांचा आनंद घेता आला. सुमारे चार तास हे कवी संमेलन चालले.
दीड हजारांहून अधिक काव्यरसिकांनी हे संमेलन यूट्युब लाइव्हवर घरबसल्या पाहण्याचा आनंद लुटला. मराठी साहित्य विश्वातील हे अशा पद्धतीने झालेले ऑनलाइन कवी संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. करोना विषाणूच्या संसर्गाने निर्माण झालेल्या संकट काळात घरबसल्या लोकांना विरंगुळा, मनोरंजन देणे हे सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे. ऑनलाईन कवी संमेलन घेऊन फुलोरा परिवाराने काव्यरसिकांची मने जिंकली. अशी ऑनलाइन कवी संमेलने भरवण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कवयित्री सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. सातपुते यांनी आभार मानले.