पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रोचे ऑनलाईन उद्घाटन; विरोधकांवर साधला निशाणा

PM Modi Pune Metro Inauguration | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण संपन्न झाले. ऑनलाईन पध्दतीने नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, निलम गोऱ्हेसह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
आज संध्याकाळी 4 वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आहे. दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर आज पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत राहून विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन केले.
Speaking at launch of various projects in Maharashtra. These will give a boost to urban development and significantly add to ‘Ease of Living’ for the people. https://t.co/0hXLSIJTGN
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2024
या विकासकामांचे मोदींच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन
– जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या प्रवासी सेवेचा शुभारंभ
– स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन
– सोलापूर विमानतळाचे उद्घाटन
– भिडे वाडा येथील स्मारकाचे भूमिपूजन
– राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
पुण्यातील माझ्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना माझा नमस्कार, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी संवादाला सुरुवात केली. “दोन दिवसांपूर्वी मला पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण करण्यासाठी यायचं होते. मात्र पावसामुळे तो कार्यक्रम रद्द झाला. त्यात माझे नुकसान झाले. पुणे शहराच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यामध्ये येताना ऊर्जा मिळते. पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे.”
पुढे ते म्हणाले, “पुण्यात मेट्रो बनवण्याचे २००८ मध्ये ठरले होते पण २०१६ मध्ये आम्ही काम करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सरकारने तर मेट्रोचा एक पिलर बांधले नाही. डबल इंजिन सरकार आधी अनेक प्रकल्पांना उशीर झाला होता. आता एक लक्ष ठेऊन पुढे जायचं आहे, विकसित महाराष्ट्र, विकसित देशाचे केंद्र पुणे राहणार आहे,” असा विश्वासही यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.





