विशाल भालेराव
खडकवासला -सध्या सोशल मीडियावर कोण होणार नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य? आपली पसंती कोणाला? कोण निवडून येणार? पुरुष गटातून कोण उमेदवार असणार? असे एक ना अनेक प्रश्नांचे सध्या हवेली तालुक्यात ऑनलाइन पोलचे पेव फुटले आहे.
यासाठी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर जोरदार कामाला लागले आहेत. चुकीच्या पोलमुळे अनेकांची फसगत होताना दिसत आहे. ज्यांनी पोल बनविला त्यांनाच मते जास्त जात असल्याने ऑनलाइन सुद्धा फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या मतांची देखील सेटलमेंट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
पुणे महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर झाली आणि इच्छुकांकडून आखाडे बांधण्यास सुरूवात झाली, कार्यक्रम, वाढदिवस, सहली आणि वस्तूंचे वाटप करणाऱ्या महिलांचे कार्यक्रम जोरदार सुरू झाले आहेत. त्यातच निवडणूक नियोजन करणाऱ्या टीमने मत पसंती सर्व्हेचा नवा फंडा बाजारात आणला आणि भावी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
आपल्या नेत्यांच्या नावाची लिंक तयार करून या प्रभागातुन तुमची पसंती कोणाला? प्रभाग, गण, गटातून कोण निवडणूक येणार? पुरुष गटातून कोण सक्षम उमेदवार? असे एक ना अनेक प्रश्न देऊन कार्यकर्ते कामाला लावले आहेत. निवडणूक व्यवस्थापन टीम यामध्ये पण हॅक पॉलिसी वापरत आहे.
आपल्या उमेदवारास कशी जास्त पसंती मिळत आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात ऑनलाइन पोलचे पेव फुटले आहे. प्रत्यक्षात ही बोगस यंत्रणा असून चुकीचा पोल केला जात आहे, अशी चर्चा पश्चिम हवेलीत रंगली आहे.
नेटकऱ्यांकडून “सोशल’वर कानपिचक्या
सध्या सोशल मीडियावर आपल्याला कोणता उमेदवार योग्य वाटतो. असा प्रश्न उपस्थित केला असता. घराणेशाही मधला? टेंडरमधून कमिशन खाणारा? गावामध्ये मंजूर झालेले रस्ते स्वतःच्या मतलबासाठी अडवून नागरिकांना वेठीस धरणारा? 100 रुपयांच्या कामात 50 रुपये स्वतःला ठेवणारा? सरकारी जमिनी त्याब्यात ठेऊन स्वकमाई करणारा? मतदारांना दारू, मटण, पैसे, भेटवस्तू देणारा? कचरा डेपो आणणारा? बेकायदेशीर खासगी सावकारी करणारा? सरळमार्गी पैशाची उधळपट्टी न करता आचारसंहितेचे पालन करणारा? अशा कानपिचक्या नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत.