ऑनलाइन शिक्षण थांबविणाऱ्या शाळांवर कारवाई

पालक संघटनांकडून संताप व्यक्‍त; प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन

 

पुणे – फी न भरल्याने ऑनलाइन शिक्षण थांबविण्याचे प्रकार काही शाळांमध्ये घडले आहेत. यावर पालक संघटनांनी संताप व्यक्‍त करत संबंधित शाळांवर कारवाईची मागणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे सुनावणीत केली आहे.

लॉकडाऊनमुळे पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू करून फी वसूलीचा तगादा लावला आहे. त्यामुळे पालकांनी शुक्रवारी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यांनी सुनावणीबाबतचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पुणे महापालिका शिक्षण मंडळ कार्यालयात शनिवारी 17 शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक, क्षेत्रिय अधिकारी यांना सुनावणीसाठी बोलावले होते. यावेळी सहसंचालक दिनकर टेमकर, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी मीनाक्षी राऊत आदी उपस्थित होते.

फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवू नका, शाळांचे ऑडिट करावे, शाळांनी कोणत्याही सुविधा न पुरविता संपूर्ण फीची मागणी करू नये, “आरटीई’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करा, फी न भरल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया थांबवू नये आदी मागण्या पालकांकडून करण्यात आल्या, अशी माहिती पालक संघटनांचे प्रतिनिधी कालिदास जाधव यांनी दिली.

केवळ 7 शाळांची सुनावणी झाली असून त्यातही ठोस निर्णय झालेले नाहीत. यावेळी पालक, शाळांचे प्रतिनिधी, अधिकारी यांच्यात वांदग झाले. आता पुन्हा 17 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.