Online betting case: अवैध ऑनलाइन सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अनुराग द्विवेदी याच्या विरोधात मोठी कारवाई करत ईडीने त्याच्या आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. ३१ डिसेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली, मुंबई, सुरत, लखनऊ आणि वाराणसीसह नऊ ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. लँड रोव्हर आणि बीएमडब्ल्यू ताब्यात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत केलेल्या या कारवाईत अनुराग द्विवेदीच्या ताफ्यातील लँड रोव्हर डिफेंडर आणि BMW Z4 या अत्यंत महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही ईडीने आपल्या ताब्यात घेतली आहेत. हवालामार्फत दुबईत गुंतवणूक ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनुराग द्विवेदीने सट्टेबाजीच्या माध्यमातून कमावलेला पैसा हवालामार्फत दुबईतील रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचे उघड झाले आहे. तसेच, त्याची सुमारे ३ कोटी रुपयांची चल संपत्ती, ज्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स, इन्शुरन्स पॉलिसी आणि बँक बॅलन्सचा समावेश आहे, ती ‘पीएमएलए’च्या कलम १७(१ए) अंतर्गत गोठवण्यात (Freeze) आली आहे. कारवाईचा घटनाक्रम: १७ डिसेंबर २०२५: यापूर्वी झालेल्या छापेमारीत लॅम्बोर्गिनी उरुस, मर्सिडीज, फोर्ड एंडेव्हर आणि थार यांसारख्या ४ गाड्या आणि २० लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. ३१ डिसेंबर – १ जानेवारी २०२६: ताज्या कारवाईत दोन नवीन गाड्या आणि कागदपत्रे जप्त. आतापर्यंतची जप्ती: तपास यंत्रणेने आतापर्यंत या प्रकरणात एकूण २७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. काय आहे प्रकरण? पश्चिम बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता. सिलिगुडी येथील सोनू कुमार ठाकूर आणि विशाल भारद्वाज हे बनावट बँक खात्यांचा (Mule Accounts) वापर करून ऑनलाइन सट्टेबाजीचे रॅकेट चालवत होते. अनुराग द्विवेदीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या सट्टेबाजी ॲप्सचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आणि त्याबदल्यात गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा मिळवला. फरारी घोषित होण्याची शक्यता? ईडीने दिलेल्या माहितीनुसार, अनुराग द्विवेदी सध्या दुबईत वास्तव्यास आहे. वारंवार समन्स बजावूनही तो चौकशीसाठी हजर न राहता तपासात सहकार्य टाळत आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली असून १ ऑगस्ट २०२५ रोजी कोलकाता विशेष न्यायालयात दोषारोपपत्र (Charge-sheet) दाखल करण्यात आले आहे.