पुणे -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र शनिवारपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेतील माध्यमिक शाळांनी मंडळाच्या संकेतस्थळावर आपापल्या लॉनिगमधून ऑनलाइन प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे. प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारू नये.
प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून त्यावर स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधणे गरजेचे आहे.
प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावरून करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा यांनी सूचनांची कार्यवाही करणे आवश्यक आहे.