वेळापत्रक आठवड्याभरात जाहीर करणार पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी मागील शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांना उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच, ठिकठिकाणी परीक्षा केंद्रे असल्याने बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना सहजपणे परीक्षा देता आल्या. या पार्श्वभूमीवर या वर्षीसुद्धा पदवी आणि पदव्युत्तर (यूजी व पीजी) परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी दिली. विद्यापीठाच्या आवारात असलेल्या विविध विभागांमध्ये चालणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी गेल्या वर्षीपासून ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेणे सुरू केले. पदवी आणि पदव्युत्तर अशा एकूण 95 अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यासाठी राज्याच्या विविध भागांत परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. ही ऑनलाईन प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सोयीची ठरली. त्यांना परीक्षांसाठी पुण्यात येण्याची आवश्यकता नव्हती, तर ते आपल्या गावाजवळ असणाऱ्या केंद्रावर परीक्षा देऊ शकले. त्यामुळे या परीक्षांना खूप चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षासाठीसुद्धा ऑनलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याबाबतची घोषणा व सविस्तर कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल, असे प्रा. करमळकर यांनी सांगितले.