आचारसंहिता उल्लंघनाच्या ऑनलाईन 141 तक्रारी

मावळ लोकसभा ः मोबाईल ऍपचा मोठ्या प्रमाणात वापर

पिंपरी  – निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या घटना सतत घडत असतात. निवडणुकीच्या धाम-धुमीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी यंदाच्या वर्षी आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांची तक्रार नोंदविण्यासाठी “सी व्हिजिल मोबाईल ऍप’ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून 31 मार्च अखेर ऍपच्या माध्यमातून 141 तक्रारी आल्याची माहिती, निवडणूक कार्यालयाने दिली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रारी नोंदविण्यासाठी ऍप विकसित करण्यात आले आहे.

या ऍपला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी ऍपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो “अपलोड’ करावा लागणार आहे. यानंतर ही माहिती अनुचित प्रकार टाळण्यासाठी तयार केलेल्या भरारी पथकाला समजल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मतदार संघाचा विस्तारलेला भाग लक्षात घेता लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परंतु, निवडणूक आयोगाने देशभरात सुरु केलेल्या ऍपमुळे या प्रकारांना निश्‍चितपणे आळा बसेल, असा विश्‍वास निवडणूक अधिकारी व्यक्‍त करत आहेत.

तक्रारदारांची माहिती गोपनीय

आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल मोबाईल ऍप सुरु करण्यात आले आहे. हे ऍप लोकसभा निवडणुकीचे मतदानापर्यत सुरु राहणार आहे. मतदारसंघातील नागरिकांना या ऍपच्या माध्यमातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची सूचना देता येते. निवडणूक आयोगाकडून तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. तक्रारीची शहानिशा करुन तक्रारीचे निवारण केले जाणार आहे. या ऍपला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने निवडणुकीच्या काळात ऍपच्या माध्यमातून अनुचित प्रकारांना चाप बसणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.