Pune District : कांद्याने रडवले; पण फुलांमधून आशेची बीजं! बाजारभावातील घसरणीमुळे हतबल झालेला शेतकरी वळला बीजोत्पादनाकडे
Pune District : कांद्याच्या दरातील अनिश्चितता आणि साठवणुकीत होणारे नुकसान यावर बीजोत्पादन हा एक प्रभावी उपाय ठरत आहे. यामुळे जिथे तोटा होत होता, तिथेच आता शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मोकळा झाला असून कमी जागेत जास्त नफा मिळवण्याचे गणित शेतकरी मांडत आहेत.

आळेफाटा : परिसरात कांद्याला सध्या बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने हतबल झालेल्या बळीराजाने आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी कांदा बीजोत्पादनाचा नवा पर्याय निवडला आहे. एकेकाळी ज्या कांद्याने डोळ्यात पाणी आणले, त्याच कांद्याच्या फुलोऱ्यातून आता शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेची किरणे फुलताना दिसत आहेत. आळेफाटा परिसरातील अनेक शेतांमध्ये सध्या कांद्याचे पीक बहरले असून पांढऱ्या शुभ्र गोलाकार फुलांनी शिवार नटले आहे.
पारंपारिक पद्धतीने कांदा विक्री करण्याऐवजी त्याचे बियाणे तयार करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. कांद्याच्या दरातील अनिश्चितता आणि साठवणुकीत होणारे नुकसान यावर बीजोत्पादन हा एक प्रभावी उपाय ठरत आहे. यामुळे जिथे तोटा होत होता, तिथेच आता शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मोकळा झाला असून कमी जागेत जास्त नफा मिळवण्याचे गणित शेतकरी मांडत आहेत.
स्थिर उत्पन्नाचा नवा पर्याय
कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. मात्र, बीज निर्मिती हा प्रकार कमी जोखमीचा आणि स्थिर उत्पन्न देणारा ठरत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर या पद्धतीकडे वळताना दिसत आहेत. बाजारातील चढ-उतारावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे दर्जेदार बियाणे तयार करून त्याची विक्री करणे अधिक फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.
गटशेतीतून बीजोत्पादनाला चालना
काही भागात शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेतीद्वारे बीजोत्पादन सुरू केले आहे. वैयक्तिक स्तरावर प्रयोग करण्यापेक्षा गटाने केलेल्या या कामामुळे दर्जेदार बियाणे तयार होण्यास मदत होत आहे. कांदा विकून हाती काहीच लागत नसल्याची ओरड असताना, बीजोत्पादनामुळे खर्च निघून चांगला नफा हाती पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रकारे नवीन दिशा मिळत असून कांद्याचा फुलोरा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणत आहे.
शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव
कांदा विकून काहीच हाती राहत नव्हतं, उलट खर्चही निघत नव्हता म्हणून यंदा बीज निर्मितीचा निर्णय घेतला, असे मत शेतकरी प्रसाद बनकर यांनी व्यक्त केले. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण आता शेतातील फुलोरा पाहून समाधान वाटत आहे. बीजाला सध्या चांगला दर मिळत असून कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. जर बाजारभावाची परिस्थिती सुधारली नाही, तर भविष्यातही बीजोत्पादनाचाच मार्ग स्वीकारणार असल्याचे बनकर यांनी सांगितले.





