कांदा यंदाही रडवणार !

प्रतिकिलो 20 ते 26 रुपये भावकांदा यंदाही रडवणार! 
पुणे –
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हळूहळू वाढत असून शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कांद्याला जादा भाव मिळण्याची शक्‍यता असल्याने कांदा साठवला जात आहे. सध्या किरकोळ बाजारात कांद्याची प्रतिकिलो 20 ते 26 रुपये भावाने विक्री होत आहे. येत्या काही दिवसात कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक घटली आहे. परिणामी किरकोळ तसेच घाऊक बाजारात कांद्याचे भाव वाढत आहेत. “सध्या बाजारात रोज 70 ते 80 ट्रक कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. महिनाभरापूर्वी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रोज 125 ते 150 ट्रक कांदा विक्रीसाठी पाठविला जात होता. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.

मात्र, आता दुष्काळ तसेच पाणीटंचाईमुळे कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात टप्प्याटप्प्याने वाढ होत चालली आहे,’ असे निरीक्षण मार्केटयार्डातील कांदा व्यापारी विलास रायकर यांनी नोंदविले आहे. पावसावर कांद्याचे अर्थकारण अवलंबून आहे. पावसाने ओढ दिल्यास कांद्याच्या भावात येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी जादा भावाच्या आशेने कांदा साठविला आहे. उन्हाळ्यामुळे कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम होत असून खराब कांदे बाजारात विक्रीसाठी पाठविले जाण्याची शक्‍यता आहे. नवीन कांदा लागवड पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. येत्या काही दिवसांत चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याला जादा भाव मिळेल. सध्या एक किलो कांद्याची विक्री 15 ते 16 रुपये दराने केली जात आहे, असे रायकर यांनी नमूद केले.

पाऊस सुरू झाल्यानंतर कांद्याचा आणखी तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता असून त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. घाऊक बाजाराबरोबरच किरकोळ बाजारातही कांद्याच्या भावात वाढ होईल.

– प्रकाश ढमढेरे, व्यापारी, किरकोळ बाजार.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.