Satara। भाव वधारल्याने खाद्यपदार्थांमधून कांदा गायब

सातारा, – सध्या कांद्याचा भाव वधारल्याने कांदा खरेदीत गृहिणी आखडता हात घेऊ लागल्या आहेत. घाऊक बाजारातही कांद्याचे दर चढते राहिल्याने किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणार्यांपासून हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा समावेश असलेल्या पदार्थांचे दर तूर्त वाढवले आहेत. काही ठिकाणी डिशेससोबत कांद्याऐवजी ग्राहकांना कोबी किंवा काकडी देण्यात येत आहे.
सध्या बाजारात मागणीपेक्षा कांद्याची आवक कमी आहे. परिणामी कांद्याचे दर वाढू लागले आहेत. सातारा शहरात किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचा भाव किलोमागे 80 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत झाला आहे. नवीन कांदा बाजारात आला असला, तरी जुन्या कांद्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचा भाव आणखी काही दिवस तेजीत राहील, असे चित्र आहे. याला विक्रेत्यांकडून दुजोरा मिळत आहे. या भाववाढीमुळे एरवी दोन-तीन किलो कांदा नेणारे ग्राहक आता अर्ध्या किलोवर आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरातील विविध ठिकाणच्या मंडईसह मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या मंडईतही कांद्याचा भाव वधारला आहे.
कोबी मंच्युरियनची मागणी वाढली
शहरातील विविध ठिकाणी हातगाड्यांवर, बेकरीमध्ये कोबी मंच्युरियन मिळते. गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांचा कोबी मंच्युरियन खाण्याकडे कल वाढल्याचे दिसत आहे. कांदाभजीचे दर वाढल्याने सर्वसामान्यांनी आपला मोर्चा कोबी मंच्युरियनकडे वळवला आहे. युवा वर्गाकडून कोबी मंच्युरियनबरोबर सँडविचची मागणी काही प्रमाणात वाढली आहे.
ऑम्लेटवरही झाला परिणाम
कांद्याच्या वाढत्या भावामुळे शहरातील हॉटेलांमध्ये कांदाभजी, मिसळ, पावभाजी यासह हातगाड्यांवर किरकोळ खाद्यपदार्थ विकणार्यांनी भेळ, ऑम्लेट या पदार्थांमध्ये कांदा घालण्याचे प्रमाण कमी केले आहे. काही ठिकाणी या पदार्थ्यांच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ढाब्यांवर तर ग्राहकांना कांदा देणेच बंद झाले आहे. ज्या ग्राहकांना ताटाबरोबर कांदा हवा असेल, त्यांना जादा दर आकारला जात आहे.





