राजुरी, – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू असून त्यामुळे शेतकर्यांच्या कांदा लागवडी खोळंबल्या आहेत. सध्या कांदा लागवडी कामांची लगबग सुरू आहे. दिवसा विद्युतपुरवठा पुरेशा दाबाने नसल्यामुळे कांदा लागवडी सध्या अडचणीत आल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकर्यांनी चढ्या दराने कांदा रोपाची खरेदी केली असून सध्या कांदा लागवडीसाठी या परिसरातील बेल्हे, राजुरी, जाधववाडी, उंचखडक, गुंजाळवाडी, तांबेवाडी, बोरी बुद्रुक, बांगरवाडी, गुळुंचवाडी आदी गावांमध्ये सध्या विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही.विद्युतपुरवठा आल्यानंतर काही मिनिटांतच परत विद्युतपुरवठा खंडित होतो. सध्या या परिसरात गहू, हरभरा, ज्वारी, मका आदी पिकांना पाणी देण्यासाठी वीज नसल्यामुळे शेतकरी संकटात आला. तर या परिसरातील गावांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असून विद्युतपुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकर्यांनी कांदा लागवडीसाठी विद्युतपुरवठा नसल्यामुळे शेतकर्यांनी कांदा लागवडीसाठी आणलेल्या मजुरांची मजुरी अंगावर भरून द्यावी लागत आहे. त्यामुळे विद्युतपुरवठा सुरळीत झाल्याशिवाय कांदा लागवडी होणार नाही. विकत खरेदी केलेले कांदा रोपांची नुकसान होऊ शकते. तसेच कांदा लागवड ही दिवसा केली जाते पण या परिसरात काही वेळा रात्रीची वीज असते; मात्र रात्रीची कांदा लागवड करणे शक्य नाही त्यामुळे महावितरणने या गावांमध्ये दिवसा विद्युतपुरवठा करावा, अशी मागणी संतोष डौले, संदीप औटी, पांडुरंग औटी, भिमाजी कणसे यांनी केली आहे.