पाटणा – पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलग तिसरा कार्यकाळ मिळणार असल्याचा विश्वास भाजप नेते बोलून दाखवत आहेत. मात्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्याही पुढे एक पाऊल टाकले. त्यांनी मोदींना थेट चौथी टर्म देण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर होईल. त्यामुळे सर्वच पक्ष सज्ज होऊ लागले आहेत. अद्याप प्रचाराचे नारळ फोडले गेले नसले तरी राजकीय नेत्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचाराचे रणशिंग फुंकणे सुरू केले आहे. त्यामध्ये मागे नसलेले भाजप नेते केंद्रात पुन्हा सत्ता निश्चित असल्याचे दावे करत आहेत. तशात बुधवारी बिहार दौऱ्यावर असणाऱ्या राजनाथ यांनी भाजपचे लक्ष्य केवळ केंद्रातील तिसरी टर्म नसून चौथीही असल्याचे संकेत दिले. आम्हाला राष्ट्र उभारणीसाठी निवडणुका जिंकायच्या आहेत. सत्ता मिळवणे हा त्यामागील उद्देश नाही. त्यामुळे मोदींना केवळ तिसरी नव्हे; तर सलग चौथी टर्म मिळेल याची निश्चिती करण्याचे आवाहन मी जनतेला करतो, असे त्यांनी एका सभेत बोलताना म्हटले.