Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ च्या स्क्रिनिंगदरम्यान 35 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

आंध्र प्रदेश : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा चित्रपट सध्या हाऊसफुल्ल सुरु आहे. एकीकडे चित्रपटाला प्रचंड उत्साह मिळत असताना आंध्रप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ‘पुष्पा 2’ च्या स्क्रिनिंगदरम्यान 35 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
अनंतपूर या जिल्ह्यातील रायदुर्गम येथील स्थानिक थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ च्या मॅटिनी शोदरम्यान 35 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. कल्याणदुर्गमचे डीएसपी रवी बाबू यांनी सांगितले की, थिएटरच्या सफाई कर्मचाऱ्यांना सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हरिजन मधनाप्पा मृतावस्थेत आढळले.
त्या व्यक्तीचा मृत्यू केव्हा झाला हे स्पष्ट झाले नाही मात्र मॅटिनी शोनंतर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. यामुळे त्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली. मधनाप्पा सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मॅटिनी शोसाठी थिएटरमध्ये मद्यधुंद अवस्थेत आला होता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.





