चोरीच्या चार गुन्ह्यात एकाला सक्तमजुरी

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना पानसरे यांचा आदेश : प्रत्येक गुन्ह्यात पाच हजार रुपये दंड
पुणे – येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी करणाऱ्याला चार गुन्ह्यात एक वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना पानसरे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवस कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

आकाश हेमराज परदेशी (वय 26, रा. यशवंतनगर, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. चारीही प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली. पहिल्या घटनेत महिला डॉक्‍टरांनी फिर्याद दिली आहे. कल्याणीनगर भागात असलेले रुग्णालय बंद करून त्या 31 मार्च 2012 रोजी रात्री 8 वाजता घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी कर्मचारी रुग्णालयात गेले. त्यावेळी कुलूप तुटले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आत जावून पाहिले असता चार हजार रुपये किंमतीच्या पितळीच्या तीन समईंची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या गुन्ह्यात साफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांनी 8 मे 2012 रोजी रात्री 9 वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ती दुचाकी चोरी झाल्याचे आढळून आले. तिसऱ्या गुन्ह्यातील महिला अमित रुग्णालयात कामाला होती. 28 जून 2012 रोजी त्या नेहमीप्रमाणे कामाला गेल्या होत्या. मात्र, त्या दिवशी पाऊस सुरू होता. त्यामुळे त्यांनी रुग्णालयातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 ला पर्स काऊंटरवर ठेवून त्या बाथरूमला गेल्या. त्यावेळी तेथून पर्स गायब झाली होती. मोबाईल, नकली दागिने आणि रोख रक्कम मिळून 1650 रुपये लांबविण्यात आले होते. तर चौथ्या गुन्ह्याबाबत ऋषभ कांतीलाल सोलंकी यांनी फिर्याद दिली आहे. ते 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 3 च्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गहुंजे येथे गेले होते. पार्टी झाल्यानंतर त्यांनी मित्राच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांना फोन आला. मेडिकलचे कुलूप तुटले आहे. साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. त्यावेळी ते तेथे गेले. ड्राव्हरमधील 2 हजार 230 रुपयांची चोरी झाल्याचे त्यांच्या निर्दर्शनास आली. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. येरवडा पोलिसांनी चारीही प्रकरणात तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. वामन कोळी यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.