“सीईटी’ बाबत “हा’ झाला निर्णय

मुंबई – कोरोनाव्हायरसचा फैलाव, अतिवृष्टी तर कधी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ठप्प झालेल्या लोकल सेवा अशा अनेक कारणांमुळे यंदा सीईटीचे (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना दिलासा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. आधीच नोंदणी केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणांमुळे एमएचटी सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी आणखी एक संधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करतानाच अतिरिक्त सत्रासाठी 100 रुपये शुल्क देखील भरायचे आहे. हे शुल्क कॅप प्रोसेसच्या वेळी ऍडजस्ट केले जाणार असल्याचे सीईटी सेलने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, 1 ते 9 ऑक्टोबर आणि 12 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कालावधीत काही नैसर्गिक आणि आपात्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉल तिकीट आले होते, मात्र परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करून 100 रुपये शुल्क भरायचे आहे. त्यांच्यासाठी अतिरक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
सीईटी सेलकडून एमसीए सीईटी 2020 चे हॉलतिकिट म्हणजेच ऍडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, ते सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऍडमिट कार्ड डाऊनलोड करू शकणार आहेत. ही प्रवेश परीक्षा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स 2020-21 या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जात आहे.




