पुणे | वनराज आंदेकर खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनामध्ये महत्वाची भूमिका बजावणार्याला गुन्हे शाखेने अटक केली. प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (३३,रा. भाजी मंडई समाधान चौक, नानापेठ) असे त्याचे नाव आहे.
न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पोलिसांनी २० जणांना अटक केली असून, दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी माहिती दिली. बेल्हेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच तो गुंड सूरज ठोंबरे टोळीचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी गणेश कोमकर आणि टोळीप्रमुख सोम्या गायकवाड यांच्यात दुवा म्हणून बेल्हेकर याने भूमिका बजावली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये गणेश कोमकर आणि सोम्या गायकवाड यांच्यात तीन ते चार बैठका देखील बेल्हेकर याने घडवून आणल्या.
गणेश आणि बेल्हेकर यांच्यामध्ये त्या कालावधीत झालेले व्हॉट्स अॅप कॉल रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहे. वनराज यांचा खून झाल्यापासून बेल्हेकर हा फरार होता. दरम्यान, वनराज आंदेकर यांच्या खुनात कोमकर कुटुंबीयांचा सहभाग समोर आला आहे.
कोमकरवर आरोपींच्या जामिनाची जबाबदारी
गणेश कोमकर तसेच सोमा गायकवाड, अनिकेत दूधभाते व प्रसाद बेल्हेकर यांची गेल्या काही महिन्यांमध्ये चार वेळा भेटी झाल्या आहेत. या भेटीत खुनासंदंर्भात बोलणी झाली असून, कटात चौघेही प्रमुख भूमिकेत आहेत.
गणेश कोमकर याच्यावर वनराज याचा खून करणार्या आरोपींच्या जामिनाची जबाबदारी दिली होती. लागेल तो पैसा व इतर खर्च कोमकर देणार होता. मात्र, त्यांच्यात किती रुपयांची “डील’ झाली हे समोर आलेले नाही.




