पुणे | पाच वर्षीय विधी सीईटीसाठी महिनाभराची मुदतवाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तीन वर्षीय व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम प्रवेशास अनिवार्य असलेली सीईटीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पाच वर्षीय विधीच्या सीईटीसाठी तब्बल एक महिना म्हणजेच १८ मार्चपर्यंत, तर तीन वर्षीय विधी सीईटीसाठी अर्ज करण्यास दोन दिवस अर्थात २४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात विधी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. तीन वर्षीय या सीईटीसाठी यापूर्वीही दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा उमेदवार व पालकांची केलेल्या मागणीचा विचार करून एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे, तसेच तीन वर्षीय विधीच्या सीईटीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देत राज्य सीईटी सेलने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेलकडे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. विद्यार्थी हिताचा विचार करून सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. सीईटी परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, नोंदणी वेळापत्रक माहिती पुस्तिकाही राज्य सीईटी सेलच्या https://www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.





