तब्बल दहा लाख जीव होणार नामशेष; हत्ती, बेडूक, शार्क यांचे अस्तित्व संपण्याचा धोका

वॉशिंग्टन – डायनासोरसारखे महाकाय प्राणी नामशेष होण्याचा इतिहास सर्वांना माहीत असताना आता सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असलेले आणखी काही प्राणी येत्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये नामशेष होण्याचा धोका वर्ल्ड वाईल्डलाईफ फाऊंडेशनने म्हणजेच डब्लूडब्लूएफने सुचित केला आहे.
फाउंडेशनने दिलेल्या माहितीप्रमाणे येत्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये पृथ्वीवरून शार्क मासे, हत्ती आणि बेडूक यासारखे प्राणी कायमस्वरूपी नामशेष होऊ शकतात. याशिवाय समुद्रात असणारे लाखो जीव ज्यामध्ये माशांचा समावेश असेल ते सुद्धा नामशेष होऊ शकतात.
येत्या काही वर्षांमध्ये पृथ्वीवरून विविध प्रकारच्या तब्बल दहा लाख जीवांचे अस्तित्व संपेल असा धोका डब्ल्यूडब्ल्यूएफने सूचित केला आहे. डायनासोर अस्तित्वात असल्याच्या कालावधीनंतर जीव नामशेष होण्याची ही सर्वात मोठी घटना मानण्यात येणार आहे.
डब्ल्यूडब्ल्यूएफने एकूण 1 लाख 40 हजार जीवांना नामशेष होण्याच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यापैकी 40000 जीव येत्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये नामशेष होऊ शकतात असे डब्ल्यूडब्ल्यूएफने म्हटले आहे. आफ्रिकेत सापडणारे हत्ती सर्वात जास्त संकटात आहेत. गेल्या 31 वर्षांच्या कालावधीमध्ये आफ्रिकेतील या हत्तींची संख्या तब्बल 86 टक्क्याने कमी झाली आहे.
ध्रुवीय प्रदेशात बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगाने होत असल्यामुळे त्या प्रदेशात आढळणारे ध्रुवीय अस्वलही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जर्मनीत सापडणाऱ्या विशेष प्रकारांच्या बेडकांचे अस्तित्वही येत्या काही वर्षांमध्ये संपणार आहे. या सर्व जीवांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी जगातील सर्व देशांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आह,े असे डब्ल्यूडब्ल्यूएफने म्हटले आहे.

