भुईंज येथे दुचाकींच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी
Updated On:

भुईंज – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भुईंज, ता. वाई येथील सेवा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन स्कूटीवरील महिंद्रनाथ जनार्दन ढमाळ (वय 44, रा. पाचगणी, ता. महाबळेश्वर) हे जागीच ठार झाले. या अपघातात स्कूटीवर मागे बसलेला युवक आणि अपाची मोटारसायकलवरील नारायण आबुलाल जाधव (वय 32, रा. भुईंज, ता. वाई) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भुईंज येथील नारायण जाधव हे अपाची (एमएच-11-बीई-3732) मोटारसायकलवरून सेवा रस्त्याने पाचवडकडे निघाले होते. त्याच वेळी पाचगणीचे रहिवासी महिंद्रनाथ ढमाळ स्कूटी (एमएच-11-बीपी-8795) वरून भुईंजकडे निघाले होते. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार मुंगसे तपास करत आहेत.





