पालघर – पालघर जिल्ह्यात नालासोपारा परिसरात रविवारी सकाळी एका मोठ्या खड्ड्यात स्कुटी आदळल्यानंतर एका ट्रकने चिरडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी ८ वाजता घडला. मृत व्यक्तीचे नाव महेश देसाई असे आहे. तो एका खासगी कंपनीत व्यवस्थापक होता. त्याचा सहकारी लवकुश वर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोठ्या खड्ड्यात आदळल्याने स्कूटीचा तोल गेला. ज्यामुळे देसाई थेट मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडले. या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. परिसरातील रस्त्यांच्या खराब स्थितीबद्दल रहिवाशांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे घडले. हे खड्डे मृत्यूचे सापळे बनले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.