प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर देशी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या क्षेत्रामध्ये काही भागात विकसित झालेल्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे दिसून येत नव्हती. त्या अनुषंगाने पावसाळ्यात हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.निगडी प्राधिकरणाप्रमाणेच शहरातील इतर भागातील बीआरटी तसेच अन्य विकसित रस्त्यावर हिरवेगार वृक्ष असावेत, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीतील ज्या रस्त्यांवर हरित आच्छादनाचे प्रमाण कमी आहे, अशा रस्त्यांना वृक्षारोपण करताना प्राधान्य देण्यात येत आहे. या रस्त्यांवर पदपथ शेजारील जागांमध्ये दर दहा मीटर अंतरावर पर्यावरणदृष्ट्या फायदेशीर व स्थानिक हवामानाशी सुसंगत अशा देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.याशिवाय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सार्वजनिक मोकळ्या जागांवरदेखील वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहर हिरवेगार व निसर्गसंपन्न करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेचा उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग प्रयत्न करत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या वृक्षांची लागवड.. रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या देशी प्रजातींच्या वृक्षांमध्ये कडुलिंब, ताम्हण, कदंब, वड, पिंपळ, आकाशनीम, बकुळ, अर्जुन, मोहगणी, सोनचाफा, पारिजात अशा वृक्षांचा समावेश आहे. लागवड केलेल्या वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना बांबू ट्री गार्ड तसेच आवश्यकतेनुसार लोखंडी ट्री गार्ड बसवण्यात आले आहेत. तसेच या वृक्षांच्या देखरेखीच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. “रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर वृक्षारोपण केल्याने आपले शहर हरित व सुंदर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाला अनेकांचे सहकार्य मिळत आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे व शहर सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे.” – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका