उंब्रज -उंब्रज, ता. कराड गावच्या हद्दीत सरकारी जागेत व कृष्णा नदीपात्रालगत महसूल विभागाने पंचनामा केलेली 63 हजार 675 रुपये किमतीची नऊ ब्रास वाळू चोरल्या प्रकरणी रणजित संपतराव कोळी (रा. उंब्रज) याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उंब्रज सजाचे तलाठी सखाराम काळे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज येथे गट नं. 198 मध्ये चार ब्रास व कृष्णा पात्रालगत पाच ब्रास वाळू उपसा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने दि. 29 मे रोजी पंचनामा केला होता. त्यावेळी रणजित कोळी यास महसूल विभागाने समज दिली होती.
दरम्यान, पंचनामा केलेल्या वाळूबाबत रणजित याला नोटीस द्यायला तलाठी सखाराम काळे गेले असता वाळूची चोरी झाल्याचे काळे यांना समजले. त्यानंतर काळे यांनी फिर्याद नोंदवली. पोलीस नाईक युवराज पवार तपास करत आहेत.