पुणे जिल्हा | एक तास सीसीटीव्ही बंद असणे गंभीर

बारामती/ जळोची, (प्रतिनिधी)- स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही काही काळ बंद ही खूप गंभीर गोष्ट आहे. अगोदरच ईव्हीएमबाबत लोक शंका करीत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने आणि त्यांच्या यंत्रणेने अधिकची काळजी घेतली पाहिजे होती. एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, हे खूप गंभीर व चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पाडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शेकडो नागरिकांनी युगेंद्र पवार यांची भेट घेत निवेदने सादर केली. दरम्यान, त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या होत्या. तेथील सीसीटीव्ही काही काळ बंद असल्याची तक्रार शरद पवार गटाकडून केली होती. या प्रश्नावर युगेंद्र पवार यांनी स्पष्ट मांडले.
ते म्हणाले की, प्रचारादरम्यान नागरिकांनी आम्हाला ज्या समस्या सांगितल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन, नोकरी संदर्भातील कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वैद्यकीय मदत कक्ष चांगल्या प्रकारे काम करीत आहे. मदत कक्ष सुरू केल्यापासून २० लाखांपर्यंतची आतापर्यंत मदत केली आहे.
नागरिकांच्या ज्या काही वैद्यकीय समस्या असतील त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. निवडणुकीनंतर माझ्या कुटुंबातील सदस्य परदेशी दौऱ्यावर जातील. अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. याबाबत विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले की, मी बारामतीतच आहे. आणि इतरांनाही कुणाला परदेशात जायचं असेल तर.. त्यात गैर आणि चुकीचं काही नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जर अन् तर… मौन
राजकारणात उतरणार का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, आपण अनेकदा हा प्रश्न केला आहे. मीही अनेकदा नाही असं सांगितलं आहे. जर शरद पवार यांचे संकेत आले तर.. आपण राजकारणात याल का असा प्रश्न केला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.





