कर्नाळमधील एक जण करोना पॉझिटिव्ह

बाधित व्यक्तीचे कनेक्शन साताऱ्यात
सांगली (प्रतिनिधी) – मिरज तालुक्यातील कर्नाळमधील एकास कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती सातारा जिल्ह्यात गेली होती. तेथे आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीस करोनाची लागण झाली. या करोनाबाधित व्यक्तीस मिरज करोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाने कर्नाळ पूर्णपणे सील केले असून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 12 जणांच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत यांचा अहवाल आला नव्हता.
ही व्यक्ती सातारा येथील त्याच्या आजोळी मयत झाल्याने गेली होती. त्या ठिकाणी बाधित व्यक्तीचे मुंबई येथील मावस भाऊ आले होते. सातारा येथील संबंधित घरात एक व्यक्ती करोनाबाधित असल्याची माहिती सातारा आरोग्य विभागाकडून सांगली आरोग्य विभागाला देण्यात आली. त्यामुळे सांगली आरोग्य विभागाने संबंधीत करोनाबाधित व्यक्तीला ताब्यात घेऊन मिरज करोना सेंटरमध्ये दाखल केले होते. रविवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असून या व्यक्तीला करोनाची कोणतीही लक्षणे नसताना देखील त्यास करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले.
कुपवाडमधील वाघमोडेनगरमधील बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्कमधील 29 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यापैकी 26 जणांचे संस्था क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर तीन जण आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. विजयनगरमधील करोनामुळे मृत रुग्णाच्या संपर्कातील 44 जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या सर्वांना डिस्चार्ज करून होम क्वारंटाइन केले आहे.





