Satara | एक दिवस घरकुल व गावच्या स्वच्छतेसाठी उपक्रम

सातारा, – जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती वाई याच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुक्यात मंगळवारी एक दिवस घरकुल व गावच्या स्वच्छतेसाठी हा एकदिवसीय नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महास्वच्छतेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी हजारो हात पुढे सरसावले.
स्वच्छ भारत मिशन हे अभियान देशपातळीवर अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान उंचवण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करून गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली. त्याच धर्तीवर स्वच्छ भारत मिशन टप्पा – 2 मध्ये गावामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ,प्लास्टिक व्यस्थापन मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाची बांधकाम पूर्ण करण्याची कामे वेगाने सुरु आहेत. नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यांना वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छतेची आवड निर्माण होण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन , ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुक्यात विविध उपक्रम यशस्वी राबविण्यात येत आहेत.
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या पुढाकाराने वाई चषक स्पर्धा 2024 हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. त्याच धर्तीवर वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक दिवस घरकुल व गावच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमात वाई पंचायत समितीमधील सर्व खाते प्रमुख, अधिकारी, व कर्मचाऱ्यांना वाई तालुक्यातील 99 गावांना संपर्क अधिकारी नेमण्यात आले होते. त्यांच्या मार्फत गावातील मंजूर असलेली घरकुले ज्यांची कामे सुरु नाहीत अशी घरकुलाची कामे सुरु करणे , संविधान दिनानिमित्त संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करणे , स्वच्छतेची शपथ घेणे तसेच गावातील ग्रामस्थ , युवामंडळे आणि लोकसहभागातून गावातील कचरा पडणाऱ्या सार्वजनिक ठिकाणे , मंदिर परिसर ,वाड्या वस्ती , गल्ली बोळातील ठिकाणे स्वच्छ करणे , पाणी स्रोत , नदीपात्रा जवळील ठिकाणे ,पंप हाऊस , गटारे स्वच्छ करणे ,औषध फवारणी करणे , सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करणे , सार्वजनिक भिंती स्वच्छ करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रंगविणे, ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी गृहभेटी देऊन जनजागृती करणे , एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जन जागृती करणे आणि प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करणे हे उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमाला सर्व गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी वाई तालुक्यातील गावे कचरामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावासाठी श्रमदान करावे, असे आवाहन पंचायत समिती वाई गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.





