Satara | अमेरिकेतील शिक्षणासाठी प्रतीक पवारला एक कोटीची शिष्यवृत्ती
उंब्रज, (प्रतिनिधी) – वहागाव, ता. कराड येथील प्रतीक मोहन पवार याची अमेरिकेत शिक्षणासाठी तब्बल एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रतीक पवार हा मुक्त पत्रकार असून, विज्ञान, वैज्ञानिक धोरण, जागतिक आरोग्य आणि वैद्यक याविषयी वार्तांकन करतो.
सामाजिक, राजकीय वास्तव आणि विषमता, आरोग्यविषयक संकटे, विशेषतः ग्लोबल साउथमध्ये भूमिका समजून घेण्यात त्याला रस आहे. त्याचे कार्य नेचर, सायन्स, द अटलांटिक आणि अनडार्क आदींनी प्रकाशित केले आहे. तो सध्या बंगळुरू येथे रहात आहे.
प्रतीक हा एमआयटीमधील विज्ञान लेखन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तो करिअरच्या सुरुवातीला 2022 मध्ये द ओपन नोटबुकमध्ये विज्ञान लेखन फेलो होते. अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स (एएएएस) द्वारे आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रकारांसाठी फेलोशिप दिली जाते.
2019 मध्ये इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या एस. रामशेन सायन्स रायटिंग फेलोशिपही प्रतीकने मिळवली होती. त्याने 2018 मध्ये डी. वाय. पाटील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फॉर्मेटिक्समधून बायोटेक्नॉलॉजीत पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
प्रतीक पवारची एमआयटी या जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्थेमध्ये एक कोटी रुपये शिक्षण शिष्यवृत्तीसह निवड झाली आहे. तो सामान्य कुटुंबातील असून, या यशाबद्दल वहागाव पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले.





