पर्यटन विकास निधीतून चवणेश्वरला एक कोटींचा निधी

संतोष पवार
सातारा – पर्यटनस्थळाचा “क’ वर्ग दर्जा असलेल्या श्री क्षेत्र चवणेश्वरसाठी नव्याने पर्यटन विकास निधीमधून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून चवणेश्वर ते करंजखोप या उर्वरित रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. एक वर्षापूर्वी पर्यटन विकास निधीतून 2 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. मात्र, राज्यातील सत्ताबदलानंतर या निधीला स्थगिती देण्यात आली.
चवणेश्वरसाठी निधी पुन्हा आणू, असा शब्द विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ग्रामस्थांना दिला होता. कोरेगाव आणि वाई तालुक्याच्या सीमेवरील चवणेश्वर गावास 2000 मध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पर्यटनस्थळाचा “क’ वर्ग दर्जा मिळाला. दर्जा मिळूनही अनेक वर्षे हे पर्यटनस्थळ विकासापासून वंचित होते. तीन वर्षापूर्वी चवणेश्वर घाट रस्त्यासाठी 1 कोटी 33 लाखांचा निधी प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने मंजूर केला. मात्र, करोनाच्या संकटात काही त्रुटींमुळे हा निधी परत गेला होता. याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर निधी परत आला.
या निधीतून घाटातील तीन किलोमीटर रस्त्याचे काम मार्गी लागले. उर्वरित रस्ता व अन्य विकासकामांसाठी निधी मिळून चवणेश्वर पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे यासाठी रामराजे, आ. दीपक चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यानुसार दोन वर्षापूर्वी 2 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, राज्यातील सत्ताबदलानंतर याला स्थगिती आली. याबाबत सरपंच दयानंद शेरे, माजी सरपंच सौ. नीता पवार, सुरेश सुर्यवंशी, संतोष पवार, हरीदास शेरे, युवराज शेरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बजरंग पवार यांच्यासह ग्रामस्थ व युवकांनी चवणेश्वरला पुन्हा निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. या निधीबद्दल चवणेश्वर ग्रामस्थ, भाविक व पर्यटकांनी आ. रामराजे व आ. चव्हाण व संजीवराजे यांचे आभार मानले.
पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेल्या चवणेश्वरच्या विकासासाठी आ. रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केला. चवणेश्वर ग्रामस्थांचाही पाठपुरावा होता. चवणेश्वरचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर रस्ता होणे गरजेचे असल्याने रस्त्याच्या कामास प्राधान्य दिले आहे. आगामी काळात पर्यटन वाढीच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
दीपक चव्हाण,
आमदार, फलटण- कोरेगाव मतदारसंघ





